Monday 2 December 2013

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) – २०१३

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) – २०१३ 

पार्श्वभूमी आणि आधार 

राज्यातील सर्व विद्यार्थ्याना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची असल्याने महाराष्ट्र शासनाने सर्वत्र प्राथमिक व माध्यमिक शाळा उपलब्ध करुन दिल्या आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनामार्फत सध्या सुमारे १ लाख प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु असून त्यात सुमारे १.८० कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या १ लाख शाळांपैकी सुमारे ३२५७३ शाळा खाजगी आहेत. (अनुदानित २०,४५५, विना अनुदानित १२,०१८) 

२. केंद्र शासनाने भारतीय राज्यघटनेत २००२ साली दुरुस्ती करुन ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण (इ. १ ली ते ८ वी) त्यांचा मूलभूत अधिकार केला आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाने “बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९” पारित केला असून त्याची अंमलबजावणी दिनांक १ एप्रिल, २०१० पासून राज्यात सुरु झाली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ०२ एप्रिल, २०१२ रोजी हा कायदा वैध ठरविला आहे. या अधिनियमातील तरतूदीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याने “महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११” नियम अधिसूचीत केले आहेत. 

३. अधिनियम, २००९ च्या कलम-३ नुसार केंद्र शासनाने दिनांक ३१ मार्च, २०१० च्या अधिसूचनेद्वारे शिक्षण पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्याकरिता “राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांना “शैक्षणिक प्राधिकरण” म्हणून घोषित केले आहे. “राष्ट्रिय शिक्षम शिक्षण परिषद (NCTE) यांनी दिनांक २३ ऑगस्ट, २०१० व दिनां २९ जुलै, २०११ च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता (इ. १ली ते ८ वी) किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teachers Eligibility Test) TET अनिवार्य केली आहे. 

४. “बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील तरतूद लक्षात घेता, राज्य शासनाने शासन निर्णय क्र. आरटीई २०१०/प्र.क्र.५७२/प्राशि-१, दिनांक १३/०२/२०१३ व शुध्दीपत्रक दिनांक ६/०३/२०१३ द्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकांकरिता (इ. १ ली ते ८ वी) शिक्षकांची किमान व्यावसायिक अर्हता निश्चित केली आहे व तसेच “शिक्षक पात्रता परीक्षा” TET (Teachers EligibilityTest) अनिवार्य केली आहे. 

५. कायद्याच्या वरील तरतूदीच्या अनुषंगाने केंद्र शासन तसेच इतर काही राज्यानी “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teachers Eligibility Test) घेण्याची सुरुवात केलेली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teachers Eligibility Test) आयोजित करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
अर्हता 

“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ च्या तरतूदी लक्षात घेता, राज्यामध्ये इथून पुढे सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी (इयत्ता १ ली ते ८ वी करिता) खालीलप्रमाणे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात येत आहे. 

१.१) इयत्ता पहिली ते पाचवीकरिता:- 

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता- 

(i) मान्यता प्राप्त मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका (D.T.ED) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो) 

किंवा 

(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यता प्राप्त मंडळाची किमान ४५ टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो). 

किंवा 

(iii) मान्यता प्राप्त मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची, चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण 

किंवा 

(iv) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयात दोन वर्षाची पदविका (विशे शिक्षण) 

किंवा 

(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो), 

(vi) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्रमांक टसीएम-२००९/३६/०९/माश-४, दि. १० जून, २०१० अन्वये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (MCVC) शाखेअंतर्गत कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैद्दकिय सेवागटातील Crench and Pre School Management परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची शिक्षण शास्त्रात दोन वर्षाची पदविका 

ब) शिक्षक पात्रता परीक्षा ( TET) 

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण. 

१.२) इयत्ता ६ वी ते ८ वी करिता- 

अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता- 

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो) 

किंवा 

(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान ४५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाची पदवी (Bachelor in Education) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो) 

किंवा 

(iii) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किंमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण 

किंवा 

(iv) मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाची किंमान ५० टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed. उत्तीर्ण 

किंवा 

(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची एक वर्षाची B.Ed. (Special Education) पदवी उत्तीर्ण. 

किंवा 

(vi) कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैद्यकीय सेवा गटातील Crench and Pre School Management मधील पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षणशास्त्रातील एक वर्षाची पदवी. 

आणि 

ब) शिक्षक पात्रता परीक्षा (T.E.T) 

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण.
 आराखडा 

“शिक्षक पात्रका परीक्षा” (Teachers Eligibility Test) मध्ये कनिष्ठ प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व वरिष्ठ प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी) या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही गटासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका आवश्यक राहील. 

या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहील. 
पात्रता गुण 

या परीक्षेमध्य़े किमान ६० टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती/जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) उत्तीर्ण समजण्यात येईल.
वारंवारता आणि वैधता 

“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teachers Eligibility Test) दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे (किमान एकदा) शासनामार्फत घेण्यात येईल. 

उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibility Test) प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राची वैधता निर्गमित केलेल्या दिनांकपासून ७ वर्षे राहील. 

शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibility Test) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ठ होता येईल. 

शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibility Test) उत्तीर्ण होणा-या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही.
कार्यपध्दती 

“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teachers Eligibility Test) शासनातर्फे किंवा शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकरण/संस्थाद्वारे घेण्यात येईल. ह्या परीक्षेचा खर्च भागविण्यासाठी प्राधिकरण/संस्थाना योग्य ती फी आकारण्याची मुभा राहील. 

सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षाकरिता “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teachers Eligibility Test) आयोजन करण्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावर सोपविण्यात येत आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी सर्व बाबींचा विचार करुन परीक्षा घेण्याचे व्यवस्थित नियोजन करावे यामध्ये उमेदवाराकडून अर्ज स्वीकारण्यापासून मुलांना पात्रता प्रमाणपत्र देण्याच्या सर्व बाबींचा (उदा:- ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, केंद्रावर परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तयार करणे, केंद्रावर परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका OMR पध्दतीने तपासणी करणे, ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करणे, उत्तीर्ण उमेदवारांना विशिष्ट (युनिक) नोंदणी क्रमांक देणे इत्यादी ) अंतर्भाव असेल. परीक्षा परिषदेने शक्य तो सर्व बाबीकरिता संगणकीय पध्दतीचा वापर करावा.
कायदेशीर विवाद 

शिक्षक पात्रता परीक्षेसंबंधाने उद्भवनारी वाद प्रकरणे महाराष्ट्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील मुंबई उच्च न्यायालयाच्या कक्षेत राहतील.
टीईटी प्रमाणपत्र 

पात्रता परीक्षेतील संपादणूकी नुसार शासनमान्य निकषाप्रमाणे उत्तीर्ण परीक्षार्थीस पात्रता प्रमाणपत्र दिले जाईल.

स्पर्धेला सामोरे जाताना (परीक्षा- रिझल्टमधील तीव्र स्पर्धा सांभाळण्यासाठी)

स्पर्धेला सामोरे जाताना (परीक्षा- रिझल्टमधील तीव्र स्पर्धा सांभाळण्यासाठी)

स्पर्धेला
परीक्षेत मार्क कमी मिळाले, तर प्रवेश मिळणार नाही, बाकीचे पुढे जातील अशी वाक्य परीक्षेच्या आधी मुलांना सतत ऐकावी लागतात. अॅडमिशन ते प्रत्यक्ष प्रवेश या सगळ्यामध्ये प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागते. ही स्पर्धा निभावून नेताना येणाऱ्या ताणावर मात करण्यासाठी गरज असते, ती सकारात्मक विचारांची, सक्षमपणे आलेली परिस्थिती स्वीकारण्याची. त्यासाठी काही गोष्टीं आत्मसात करण्याची आवश्यकता असते. 
  • वेळेचे योग्य नियोजन- सुरुवातीपासूनच अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास, परीक्षेनंतर ताण जाणवणार नाही. 
  • मानसिक स्वास्थ्य – बुद्धी ही गोष्ट आपल्या हातात नाही. पण परीक्षेत यश मिळविण्यासाठी कसून प्रयत्न करणे ही गोष्ट तुमच्या हातात आहे. त्यात कमी पडू नका. 
  • सकारात्मक विचार- अपयश आले तर काय या विचाराने खचून जाऊ नका. अपयश का आले याच्यापेक्षा ते अपयश यशात कसे बदलता येईल याचा विचार करा.
  • अपेक्षा लादू नका – परीक्षा, रिझल्टची तीव्र स्पर्धा समजून घेऊन, पालकांनीही आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. पालकांनी त्यांना आधार द्यायला हवा. मुलांच्या मेहनतीचे, त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करायला हवे. आपल्या मुलांची कुवत ओळखून मुलांकडून अपेक्षा ठेवली पाहिजे हे लक्षात ठेवा. आपल्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलांबरोबर करणे टाळाच. 
परीक्षा म्हणजे तुमच्या मानसिक आणि शारीरिक कुवतीचा कस पाहणारी एक व्यवस्था असते. त्यामुळे स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. यश नक्कीच तुमचे असते. 
एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी श्वसनाचे साधे व्यायाम, ध्यान धारणा उपयोगी पडते. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मननिकोप बनतं. 
दहावी आणि बारावीच्या परीक्षांप्रमाणे इतर प्रवेश परीक्षांना आता सुरुवात होईल. एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या विविध परीक्षांवर अनेक विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून असल्याने ताण हा असणारच. या ताण टाळण्यासाठी सुरुवातीपासून अभ्यासाची तयारी करणंच उत्तम. 

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कधी करण्याच्या हेतूने इ.५ वी ते इ.७ वीतील  मुलींसाठी १९९५-९६ पासून शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर इ.८ वी ते इ. १० वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने २००३-०४ सालापासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत इ.८ वी ते इ. १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने रुपये १०० /- प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते.या शिष्यवृत्ती योजनेमुळे ग्रामीण भागातील दलित विद्यार्थीनीला दरमहा रु.१०० /- मिळणार आहेत. ज्या घरात मुलगी म्हणजे ओझे समजले जाते अशा घरात तिला आता न्याय मिळू शकेल. मुलींचे सक्षमीकरण कारणे हा या योजनेमागचा हेतू आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, अनुदानित,विनानुदानित, माध्यमिक शाळेतील इ.८ वी ते इ. १० वी च्या मुलींसाठी असून ती गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहील. यासाठी मागासवर्गीय मुलींना उत्पन्नाची अट राहणार नाही. परंतु शाळेतील उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे. उपस्थितीनुसार शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी मुलींना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

सर्व शिक्षा अभियान

सर्व शिक्षा अभियान

सर्व शिक्षा अभियान
उद्दिष्ट :
‘शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षणावर तसेच जीवनासाठीच्या शिक्षणावर भर देणे, ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करणे व सन २०१० पर्यंत त्यांना शाळेत टिकवून ठेवणे’ , हे सर्व शिक्षा अभियान योजनेचे उद्दिष्ट आहे.
लाभ :
या योजनेअंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत घालण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रवृत्त केले जाते. या अभियानाअंतर्गत शिक्षकांसाठी खास प्रशिक्षण कार्यक्रम आखण्यात आला आहे. तसेच शाळा खोल्यांचे बांधकाम, मोफत पाठ्यपुस्तके, गटसाधन केंद्र व समूहसाधन केंद्राचे बांधकाम, शाळा अनुदान, शिक्षण अनुदान, अपंग मुलांसाठी मदत, आरोग्य तपासणीत दुर्धर आजार असलेल्या मुलांवर खास उपचार असे विविध उपक्रम राबविले जातात.
संपर्क :
सर्व शिक्षा अभियान योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती किंवा शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधावा.

सर्जनशील विचारातील घटक

सर्जनशील विचारातील घटक

प्रत्येकाला आपला यशाचा आणि सुखाचा मार्ग विचारातून शोधायचा असतो. नवनवीन विचारांची सुरुवात म्हणजेच सर्जनशील विचार होय. आपण जर स्वातंत्र्यपूर्ण विचार केला तर सर्जनशील विचारातील घटक निर्माण होत राहतात. आपले आयुष्य घडवण्यासाठी आपल्या विचारांचा पाया पक्का असायला हवा. त्यासोबत स्वत:च्या आत्मविश्वासाबद्दल जाणीव होणे अपेक्षित आहे. भवितव्य घडविण्यात सर्जनशील विचारांचा मोठ्या प्रमाणावर वाटा असतो. 
● सर्जनशील विचारातील घटक :  
१. दृष्टीकोन : वेगवगळ्या प्रकारचा दृष्टीकोन हा सर्जनशील विचारातील महत्त्वाचा घटक आहे. आपण आपल्या जीवनाकडे चांगल्या दृष्टिकोनातून पहिले तर आपल्याला जगण्याचे विविध मार्ग सापडू शकतील.
२. सकारात्मकता : विचार लहान किंवा मोठा असला तरी चालेल, हा विचार सकारात्मक असणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार हा इच्छाशक्ती, उत्साह आणि दिशा यांना टिकवून ठेवतो व माणूस हा आयुष्याबद्दल आशावादी राहतो.
३.  नाविन्य : नाविन्य म्हणजे वेगळा आणि नवीन विचार होय. सर्जनशील विचारात सतत काही तरी नवीन सांगण्याचा प्रयत्न असतो. नवीन शिकत आणि अनुभवत राहिल्यामुळे ज्ञानाची अनेक दारे खुली होतात. त्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास जलद होतो.
४.  प्रेरणा : सर्जनशील विचारात प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टी असतात. पाया आणि आधार हा मजबूत प्रमाणत सर्जनशील विचाराला मिळालेला असतो. या विचारामागे ठराविक दिशा असते म्हणून ती मार्गदर्शक ठरते आणि प्रेरणा देते.
५. विचारातील वस्तुनिष्ठता : सर्जनशील विचारातील मांडणी ही थोडक्यात आणि सोप्या पद्धतीत केलेली असते. यालाच विचारातील वस्तुनिष्ठता म्हणतात. माणसाच्या जीवनावर चांगल्या प्रकारे भाष्य केले असते. त्यामुळे प्रत्येकाला हा विचार त्याचे जीवन घडवण्यात मदत करत असतो. 
आपण सर्जनशील विचार करणे आणि त्या विचाराच्या दिशेने मार्ग काढत आयुष्याची प्रगती साधने खूप महत्त्वाचे आहे.

समाजातीलदुर्बल घटकातील मुलांना शिक्षण

समाजातीलदुर्बल घटकातील मुलांना शिक्षण

मुलांना शिक्षण
समजातील दुर्बल घटकांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे. दुर्बल घटकातील मुलांचे आणि पालकांचे शिक्षणाविषयी जाणीवा परिपक्व नसतात. आपली पाल्याने वर्गात उपस्थित राहणे, ही बाब आवश्यक आहे. परंतू ही गोष्टही पालकवर्ग गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे दुर्बल घटकातील पालकांची विचारधारा बदलणे आवश्यक आहे. मुलांचे अभ्यासात अजिबात लक्ष नसते, रोजच्या व्यापातून पालकांना मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. या परिस्थितीतून मुलांना आपलेसे करण्यासाठी शिक्षकांना खूप मेहनत घ्यावी लागते.वेगळे सन मुलांबरोबर साजरे करतात.
शिक्षक वेगवेगळे सण मुलांबरोबर साजरे करतात. त्या सणाच्या माध्यमातून खेळ – स्पर्धा घेतले जातात. त्यामुळे मुले आनंदी राहतात. उदा. मकर संक्रांतीला तिळगुळ आणि लाडूचा कार्यक्रम, शाळेत पतंग उडवणे, गणेशोत्सवात गणपती शाळेत आणून त्याची पूजा-आरती दररोज करणे, रक्षाबंधन. असे अनेक क्षणांचे महत्व शिक्षक मुलांना सांगतात आणि मुले उत्साहाने सहभागी होतात. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला मुलांना स्वातंत्र्याचे व गणतंत्र महत्त्व शिक्षक सांगतात , त्या दिवशी सर्व शाळेत ध्वज वंदन आणि राष्ट्रगीत म्हटले जाते.
निरनिराळ्या सणांच्या व खेळांच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाची आणि अभ्यासाची गोडी लागावी , हा शिक्षकांचा त्यामागचा उद्देश असतो. 

शिक्षकांचे संवाद कौशल्य

शिक्षकांचे संवाद कौशल्य

काही शिक्षक हे दिसायला अगदी साधारण असूनही विद्यार्थ्यांमध्ये मात्र अत्यंत प्रिय असतात. विद्यार्थी त्यांच्या येण्याची, त्यांच्या तासिकेची आतुरतेने वाट पाहत असतात. तर काही शिक्षक हे अत्यंत हुशार असूनही विद्यार्थ्यांमध्ये मात्र तितकेसे प्रिय नसतात. याचे प्रमुख कारण म्हणेजे शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी असलेला संवाद. उत्तम संवाद कौशल्य असलेले शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मन जिंकून घेतात. त्यांना समजून घेऊन त्यांचं मार्गदर्शन करतात आणि म्हणूनच त्यांच्यात ते प्रिय असतात. उत्तम संवाद कौशल्य ही एक कला आहे. तो एक प्रकारचा वशीकरण मंत्राच आहे. 
शिक्षकी पेशात तर उत्तम संवाद कौशल्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थी दशेतील विविध काळात शिक्षक आपल्या संवाद कौशल्याने विद्यार्थी कसे सांभाळतात, घडवतात याचा थोडक्यात विचार करू.
लहानपण/बालवाडी: मूळ जेव्हा पहिल्यांदा आपल्या आई, वडील आणि कुटुंबियांच्या प्रेमळ कुशीतून घराबाहेर पडते आणि बालवाडीत जाऊ लागते तेव्हा त्याची समाजातील इतर घटकांशी ओळख करून देण्याचे काम बालवाडी शिक्षिकाच करत असते. याच ठिकाणी त्या बाळाला मित्र आणि शत्रूंची ओळख होते! त्याला समाजात कसे वागावे याचे धडे प्रथमतः येथेच त्याची बाई त्याला देत असते. बालवाडीतील बाईला या सर्व मुलांची आईच होऊन राहावे लागते. त्यांचे रडणे, हसणे, धिंगाणा घालणे सर्वच पहावे लागते. या वेळी जर त्या बाई जवळ या मुलांशी कसा संवाद साधावा आणि कशाप्रकारे त्यांना आपलेसे करून घ्यावे याचे कौशल्य नसेल तर त्या मुलांचा त्या बालवाडीत जीव लागत नाही. मग ती तेथे जाने टाळतात. याउलट जर ती बाई त्या मुलांना गोड बोलून चांगले सांभाळत असेल तर अनेक ठिकाणी मुलं त्याच बाई हव्यात म्हणून आग्रह करतांना दिसून येतात. 
माध्यमिक-उच्चमाध्यमिक: हा काळ विद्यार्थ्यांच्या पायाभरणीचा काळ मनाला जातो. या वेळी प्रत्येक विषयातल्या त्यांच्या पायाभूत संकल्पना स्पष्ट होणे महत्त्वाचे असते. शिक्षकांनी चांगल्या संवाद कौशाल्याद्वारे सोप्या भाषेत विध्यार्थ्यांना विषय समजावून सांगितला तर पुढे आयुष्यभर तो त्याला नीट लक्षात राहतो. तो आपल्या मुलांना, विध्यार्थ्यांनाही तो नीट समजावून सांगू शकतो. शिक्षकांमुळेच या काळात शिक्षणाची गोडी लागते वा त्याबद्दल तिटकारा निर्माण होतो. माध्यमिक शिक्षकाची जबाबदारी फार मोठी आहे. विद्यार्थ्यांबरोबरच ते देशही घडवत असतात. यामुळे त्यांचे संवाद कौशल्य अति उत्तम असणे अत्यंत आवश्यक ठरते.  
पदवी-पदव्युत्तर: या काळात विद्यार्थ्यांची वैचारिक बैठक पक्की करण्याचे काम प्राध्यापकांवर असते. ते विद्यार्थ्यावर कसा प्रभाव टाकतात हे येथे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कला विद्यार्थी प्रत्यक्ष संवादाव्यतिरिक्त प्राध्यापकांच्या वागण्या-बोलाण्यावारुनही बऱ्याच गोष्टी शिकत असतात. तेव्हा या क्षेत्रातील शिक्षकांचे संवाद कौशल्य हे सूक्ष्म पातळीवरही उत्तम असायला हवे. त्यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीचे संबंध जोपासावे. त्यांना उत्तम चारित्र्याचे, मर्यादा पालनाचे शिक्षण आपल्या वागण्यातून द्यावे. 
अशाप्रकारे विद्यार्थी दशेतील सर्वच पातळ्यांवर शिक्षक हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बाजावत असतात. त्यांचा विद्यार्थ्यांशी  असलेला उत्तम संवादच विद्यार्थ्यांची सामाजिक, नैतिक आणि आर्थिक उन्नती घडवून आणू शकतो. विद्यार्थ्यांचे वाईट सवयींपासून संरक्षण करू शकतो आणि त्यांच्या जीवनाचे सार्थक करू शकतो.